What is logic?

लॉजिक म्हणजे काय?
लॉजिकला आपण मराठीत तर्क म्हणतो. एखादे विधान वा वागणे वा कृत्य हे लॉजिकल म्हणजे तार्किक किंवा इल्लॉजिकल म्हणजे अतार्किक असते. तार्किक वागणे, विधान मनात, समाजात, कोठेही, अगदी वैज्ञानिक वर्तुळांत स्वीकार्य असते (अपवाद – मात्राशास्त्र). अतार्किक वागण्याची विधानांची खिल्ली उडवली जाते, त्यांना स्वीकारले जात नाही. इथेही भावनात्मक वा ज्याला आपण सेंटीमेंटल म्हणतो अशा वर्तनांचा अपवाद असतो.

पण शेवटी लॉजिक म्हणजे काय?
सर्वच तत्त्वज्ञानांची, म्हणजे अगदी विज्ञान धरून सर्वच तत्त्वज्ञानांची एक गोची आहे कि त्यांना कोणतेही सत्य केवल संदर्भात (अबसॉल्यूट काँटेक्स्टमधे) सिद्ध करता येत नाही. सिद्धतेच्या पद्धतीच्या अनंत उणिवा आणि मर्यादा आड येतात. गृहितकांच्यांच सिद्धतेच्या मर्यादा आड येतात. (खालचा उतारा ज्यांचं ते क्ष्रेत्र नाही त्यांनी वरवर वाचला तरी चालेल.)

हा विषय वैज्ञानिक नाही, पण आपण उदाहरण वैज्ञानिक घेऊ. आपण म्हणतो पाण्याच्या बाष्पीभवनाचे तापमान १०० डिग्री सेल्सिअस आहे. इथे हे विधान केवल सत्य मानण्यात अनंत अडथळे येतात. प्रथमतः हे विधान नीट लिहावे लागेल. म्हणजे पाणी म्हणजे संपूर्ण शूद्ध , १००% शुद्ध पाणी. त्यात कसली भेसळ नको. शिवाय समस्थानिकांची (आयसोटोप्स) भेसळ नको. साध्या हायड्रोजनच्या जागी ड्यूटेरियम वा ट्रिटीयम असले तर बाष्पांक वाढतो. ऑक्सिजनचंही तसंच असेल. आता इतकं शुद्ध पाणी मिळणार आहे का?
आता या प्रयोगासाठी बरंच काही सुस्थिर ठेवावं लागेल. म्हणजे वातावरणाचा दाब, पृथ्वीचे गुरुत्वाकर्ष, चुंबकीय, विद्युत क्षेत्रे, अजून काही काही. फक्त काळ तेवढा बदलून कोणतेही प्रयोगकर्ते परिस्थिती वा काँटेक्स्ट तसाच ठेऊन प्रयोग पुन्हा शकतात. दुसरं काही बदललं कि उत्तर बदललं.
वातावरणाचा दाब कसा स्थिर ठेवाल? तत्त्वतः जेव्हा पाणी हळूहळू बाष्पीभूत होतं तेव्हा त्याचे रेणू हवेत जातात तेव्हा हवेचा दाब तेवढ्याने वाढतो. मग दाब स्थिर ठेवण्यासाठी फार मोठी यंत्रणा (आणि तिचे लोचे) आणावी लागेल.
बाष्पीभवन करायचं पात्र कोणत्या आकाराचं घ्यायचं? फ्लेम कशी घ्यायची? पाण्याच्या सर्व रेणूंना समप्रमाणात उर्जा देणे कसे साधायचे? पाण्यात टेंपरेचर पॉकेट्स न बनवता हळूहळू तापमान १०० ला कसं न्यायचं? पॉकेट्स बनली तर आपण निष्कर्ष पॉकेट्सच्या सरासरीवर काढत आहोत आणि कदाचित कोण्या रेणूचा स्वतःचा बाष्पांक १०० पेक्षा वेगळा नव्हताच असे म्हणता येणार नाही.
बरं त्यात धातूत ठेऊन वा अजून कशात ठेऊन तापवलं, तर अत्यंत अल्प प्रमाणात त्या धातूचे रेणू पाण्यात मिसळतात आणि बाष्पांकावर परिणाम करतात.
बरं पाण्याचं तापमान १०० झालंय का हे पाहायला काहीतरी उपकरण लावावं लागतं आणि त्या उपकरणानं नक्की किती उर्जा घेतली आहे आणि त्यांनं दाखवलेलं तापमान आणि प्रत्यक्ष पाण्याचं तापमान यांत तफावत आहे कि नाही आणि किती आहे हे सुनिश्चित करता येत नाही. का? कारण या पाण्याच्या प्रयोगात पुढे जो फॉल्ट येणार आहे तोच फॉल्ट दुर्लक्षुन हे उपकरण, समजा थर्मोइलेक्ट्रिक तापमापक, बनवलं गेलेलं असतं. म्हणजे त्या थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट्ची सिद्धता अशाच मर्यादांच्या आणि गृहितकांच्या बँडबाज्यात झालेली असते. एक राडा तर इथेच झाला. शिवाय पाण्याची रिंडिंग घ्यायच्या आणि दाखवायच्या काळाचाही फरक पडतो. म्हणजे कधी किती तापमान होते हे ते इंस्ट्रूमेंट तत्क्षणी दाखवू शकत नाही. अगदी नॅनोसेंकदांत का होईना गॅप असतो.
बरं पुढे सामान्य तापमानालामाना पण पाण्याची वाफ होते. आपण कपडे नै का वाळवत? मग ते का? तिथं कुठं १०० तापमान असतं. मग शास्त्रज्ञ म्हणतात, वाफ होणं म्हणजे मूलतः रेणूंना जास्त गतीय उर्जा लाभणं. मग वातावरणाच्या हवेमुळे किंवा पाण्यांच्या रेंणूंच्या ब्रावनियन मोशन मुळे एखाद्या रेणूला १०० तापमानाइतकी उर्जा मिळते नि तो सटकतो. म्हणजे शंभर भिकार्‍यांच्या नेहमी उपाशी राहणार्‍या कळपात लोक अचानक दोघांना २-३ भाकरी, भाज्या देतात आणि ते अपार्टमेंटच्या लोकांइतके खाऊन झोपी जातात असा प्रकार.
मग असंच असेल तर बाष्पीभवन हे हळूहळू (ग्रॅज्यूअली) व्हायला हवं नि १०० ला संपायला हवं. तसं होत नाही. त्या त्या तापमानाच्या सॅच्यूरेशन पॉइंट इतकंच बाष्पीभवन १०० ला पोचण्यापूर्वी होतं. आता ९९ डिग्रीला हे बाष्पीभवन संपत यायला हवं, पण अजिबात नाही. १०० डीग्रीला लॅटेंट हिट अबसॉब होईपर्यंत जवळजवळ सारं पाणी पाणीच राहतं आणि १०० डिग्रीला भरमसाठे लेटेंट उर्जा घेतली कि मात्र सगळं पाणी बाष्प झालेलं असतं. इथे ग्रॅज्यूअलनेस का नाही? १०० पर्यंत का वाट बघायची नि मग १ बार प्रेशरलाच सगळं पात्र रितं करायचं? रेणूंमधली बलं कशाची वाट पाहत असतात. त्यांच्यात तो टूगेदर्नेस कुठून आला?

थोडक्यात काय कि पाण्याचे १०० डिग्रीला बाष्पीभवन होते याची “केवल” भौतिक सिद्धता आणि सर्व “केवल” कारणमिमांसा अगदी विज्ञानाला देखील अशक्य आहे.

सत्ये प्रस्थापित करण्यात प्रारंभबिंदूची समस्या येते. वरच्या उदाहरणात “एक बार दाबाखाली १ किलो पाणी १०० डिग्रीला बाष्पीभूत होते” हा जो नियम आहे त्याचे अनेक धागे आहेत. त्यात अनेक शब्द आहेत, नामे आहेत, क्रिया आहेत, विशेषणे नि इतर पार्ट्स ऑफ स्पीच देखील आहेत. आकडे देखिल आहेत. एकके देखिल आहेत. सामान्य जीवनातलं एखादं वाक्य घेतलं तर ते सोपं निघेल असं समजू नका. ती वाक्ये अजूनच किचकट असतात म्हणून विज्ञानाचा स्कोप त्यातली त्यात सोप्या गोष्टींचा असतो. “रामने शामला ५० पैसे दिले.” हे विधान अत्यंत किचकट निघेल.

प्रारंभबिंदूची समस्या म्हणजे काय? आता हे विधान केवल प्रतलावर सिद्ध करायचे तेव्हा त्यात वापरलेल्या प्रत्येक नामाची आणि क्रियेची व्याख्या अगोदर द्यायला लागेल. उदा. पाणी म्हणजे हायड्रॉजन आणि ऑक्सिजन यांचे संयुज. मग आता हायड्रोजन म्हणजे काय? ऑक्सीजन म्हणजे काय? सिद्धता द्यायच्या वाक्यातली सर्वच वाक्ये घेतली आणि सिद्धतेचा जो संदर्भ मांडला आहे ती सर्व वाक्ये घेतली आणि सारी गृहितके घेतली नि त्या वाक्यांतल्या प्रत्येक शब्दाचे, संज्ञचे अगोदर स्पष्टीकरण द्यायला लागेल. त्या प्रत्येक वाक्याला सिद्ध केल्याशिवाय शेवटच्या वाक्याची अबसॉल्यूट सिद्धता देता येत नाही. पण या सार्‍या पार्श्वभूमीचा गुंताळा प्रत्येक नव्या शब्दानिशी किचकट होत जातो. हा गुंताळा असा किती किचकट होतो? तर तो जगाच्या झाडून सर्वच संकल्पनांना वेटोळे घालून बसतो. साधे पाण्याचे बाष्पीभवन पण ते सर्व शास्त्रांच्या सर्व ज्ञानाला शिउन येणार, अपुरे मानणार. म्हणून मानवाला केवल ज्ञानाचा अभ्यासच करता येत नाही. कारण भौतिकशास्त्राचा कोणता नियम त्यातली त्यात सहजतेने लिहिता आला तर तो असेल नियमाच्या विधानाच्या अंति पेन उचलेपर्यंत घडलेला अखिल ब्रह्मांडाचा इतिहास!!! हे काही संभव नाही.

म्हणून मनुष्य कोणत्याही बाबीत कसल्याही केवल सत्याच्या सिद्धतेच्या भानगडीत पडत नाही. तो सरळ हजारो, लाखो, करोडो विधाने सत्य मानतो. ती खोडली गेलेलीच असतात पण व्यवहार्य फरक पडत नाही. म्हणजे बाष्पीभवन कसे का होईना, स्टीम इंजिन चालवायचे, भात बनवायचा, इ. खरं असो वा नसो, वैवाहिक लैंगिक निष्ठता पाळायची. आपण जे करू शकत आहोत ते आपण करू शकत आहोत तर त्यांमागचे विज्ञानाचे सारे नियम ऑटोमॅटिक व्यवस्थित चालत असतीलच कि!!!

आता तुम्ही म्हणाल, कि लॉजिक म्हणजे काय ते सांगताना या रामायणाचा काय संबंध? थोडक्यात काय तर संपूर्ण विश्वाचं, विश्वकारणाचं संपूर्ण, संलग्न, ( कंप्लीट अँड कंसिस्टंट) आकलन झालेलं नसलं तर कोणत्याच विधानाला काहीही अर्थ नाही हे मानवाला सबकाँशली माहित आहे. पण ते आकलन त्याच्या प्रत्यक्ष शक्तीबाहेरचं आहे. मग तो काय करतो, दणादणा खूप सारी सत्ये प्रसवतो, गृहितके करतो, संदर्भ सुनिश्चित करतो आणि विश्वाचं कंप्लिट आणि कंसिस्टंट आकलन झाल्याचा एक छोटा माहौल बनवतो.

हा माहौल म्हणजे लॉजिक. यातली सगळी विधानं १००% सत्य असतात. १००% पूर्ण असतात. ती एकमेकांशी काँट्रडिक्ट करत नाहीत. सवत्यानं. एकत्र. यांचं कोणतंही पर्म्यूटेशन , कॉबिनेशन पर्फेक्ट असतं. या विधानांचे सगळे व्यत्यास असत्य असतात. जर एखादा व्यत्यास खरा निघाला तर ज्या कलाकाराने हा माहौल बनवला आहे तो माहौल खराब होतो, यूजलेस होतो. तिथे आपण मग त्या “केवल सत्याच्या माहौलीफिकेशनात” झालेली गडबडी दुरुस्त करून गाडी पुन्हा रुळावर आणली जाते.

तर लॉजिक म्हणजे सुसूत्र सत्य विधानांचा संच. जर केवल सत्याच्या नजरेनं पाहिलं तर जे सत्य आहे ते सुसूत्र असणारच आणि जे सुसूत्र आहे ते सत्य असणारच. पण ती फॅसिलिटी आपल्या “मौहौलिक” लॉजिकाला नाही.